सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई, पक्षाच्या भूमिकेबद्दल तांबे म्हणाले,…

नाशिक – कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असतांना निवडणुकीतून माघार घेणे, आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे.

यातच आता नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने AB फोर्म दिला तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही म्हणून पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सुधीर तांबे यांनी एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.