बाळासाहेबांना स्मरुन कुचीकवर तात्काळ कारवाई करा; चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे – शिवसेनेचे (Shiv Sena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर पुण्यात (Pune) बलात्काराचा गुन्हा दाखल. पुण्यातील दौंड येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावला. तसंच लग्नाचं आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

कुचिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख ६ नोव्हेंबर २०२० पासून ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत होती. त्या काळात सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.

त्या तरुणीला आरोपी रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमिष दाखवून, वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, गोवा याठिकाणी असलेल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये नेवून दुष्कृत्य केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे रघुनाथ कुचिक यांच्यापासून ही तरुणी गरोदर राहिली. हे कळताच रघुनाथ कुचिक यांनी जबरदस्तीनं गर्भपात करुन तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत कुचिक यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, ‘बंधू’म्हणून मिरवणारा कामगारांचा स्वंयघोषित पुढारी व शिवसेनेचा उपनेता रघुनाथ कुचिकवर बलात्कार, गर्भपाताचा गुन्हा शिवाजीनगरमध्ये दाखल झालाय. मुख्यमंत्री महोदय…फक्त गुन्हा दाखल करून नाही तर आदरणीय बाळासाहेबांना स्मरुन तात्काळ कारवाई करा. आश्चर्य..बंधू म्हणवून घेणा-या गप्प का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.