महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा,साधी दखल सुद्धा नाही; फडणविसांचा हल्लाबोल

नागपूर : राणा दाम्पत्य (Navneet Rana and ravi rana) विरुद्ध शिवसेना (shivsena) यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं. या वादानंतर अखेर राणा दाम्पत्याला (Navneet Rana and ravi rana) खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे (Disrupting the peace of the society) असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, आज खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याला थेट अतिशय गंभीर इशारा दिलाय. शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा करु नका, ‘मातोश्री’च्या वाटेला जाऊ नका नाहीतर 20 फुट खाली गाडले जाल असा अतिशय गंभीर इशारा संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. राणा दाम्पत्याने मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, “महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले,आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला, साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा,साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर  थेट अटक असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी   ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, “इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला केला आहे. याचबरोबर, “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?” अशा शब्दांमध्ये फडणवीसांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.