राजू शेट्टी यांना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा  प्रयत्न होता – फडणवीस 

मुंबई – माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी ( Raju Shetty ) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत ही घोषणा केली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

याबाबत बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadanavis ) यांनी राजू शेट्टी ( Raju Shetty) यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुळात महाविकास आघाडी सरकार बरोबर जाणे, हा राजू शेट्टी यांचा निर्णय चुकीचा होता. राजू शेट्टी यांना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP ) प्रयत्न होता, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

राजू शेट्टी हे नेहमी सत्तेच्या विरोधात लढत आलेले आहेत. राजू शेट्टी यांनी विशेष करून राष्ट्रवादी व शरद पवार यांना विरोध केला म्हणून त्यांच्यामागे जनता होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बरोबर आल्याने त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला व विश्वासार्हतेवर सुद्धा परिणाम झाला. आताचा त्यांचा निर्णय हा योग्य असून ते पुढे कदाचित थर्ड फ्रंट किंवा फोर्थ फ्रंट करतील. आमच्या विरोधात सुद्धा जातील. परंतु राजू शेट्टी यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. ते आता बाहेर पडले आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.