जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

संजय चव्हाण  – हायब्रीड सीड्स, स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे, दाल मिल, बी-बियाण्यांचे उद्योगधंदे यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालन्यात आता नवीन नेतृत्व तयार करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे यांच्यासारखे समाजाने डोक्यावर घेतलेले नेतृत्व तयार झाले आहे. त्यातच त्यांनी आता जालना लोकसभा निवडणुक लढवावी, त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मराठा समाज घेईल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी पहिलेच बाण म्यान केली असली, तरी ते नेहमी दानवे यांनाच मदत करणारे नेते म्हणून ओळखले जाता. त्यामुळे जर लोकसभेचा समाना दानवे विरूद्ध जरांगे असा झाला, तर सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

गेली २० वर्ष एक हाती गड राखलेल्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराजित करण्यासाठी त्या तोडीचे नेतृत्व जिल्हात उभे राहिले नाही, किंवा उभे राहू दिले नाही. दानवे हे १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ असे ५ वेळा ते खासदार झाले. तसेच दानवे केंद्रीय ग्राहक हक्क, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री होते, आता ते रेल्वे राज्यमंत्री पदाची धुरा संभाळत आहे. आता २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील याच मतदार संघातून त्यांच्याच नावाची चर्चा सुरु असताना मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने एक आव्हान उभे राहत आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी निर्माण केलेली भूमी लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरावी, अशी काहींची अपेक्षा असल्याचे दिसत आहे.

जनता पक्षाकडून १९७७-८० साली पुंडलिक हरी दानवे यांनी सहावी लोकसभा लढवली आणि जिंकले. १९८०-८४ आणि १९८४-८९ मध्ये काँग्रेस (आय)चे बाळासाहेब पवार विजयी झाले. १९८९-९१ साली भारतीय जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा विजयी झाले. १९९१-९६ साली काँग्रेसचे अंकुशराव टोपे , आणि अकराव्या लोकसभेपासून भाजपचे १९९६-९८ आणि १९९८-९९ उत्तमसिंह पवार आणि तेराव्या लोकसभेपासून या म्हणजे १९९९ पासून निर्विवाद पणे भाजपचे रावसाहेब दानवे पाटील विजयी होत आले आहे.

विद्यमान स्थितीत जालना मतदारसंघात जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्हांचे मिळून 3-3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विद्यमान स्थितीत भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा एक आमदार येथे आहे. जालना मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. नवव्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत या मतदार संघात भाजपचीच सत्ता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा पराभव केला होता.

जालना जिल्हातील जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ तर, औरंगाबाद जिल्हातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश होतो. या सहा ही मतदार संघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे. मराठा समाजाच्या मताच्या जोरावर दानवे यांनी आतापर्यंत पाच वेळेस हा गड राखला आहे, मात्र या मतदार संघातील मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी समाज मराठा आरक्षणाच्या भावनिक मुद्यावर आपल्या बाजूने उभा केला आहे. एसी आणि ओबीसी समाज ही काही प्रमाणात जरांगेच्या मराठा हक्काच्या मुद्यावर सोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक जर दानवे विरुद्ध जरांगे झाली, तर दानवे यांनी फटका बसण्याची शक्यता आहे.

महायुतीचा भाग म्हणून आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड, संतोष दानवे, भोकरदन, नारायण कुचे बदनापूर, मंत्री संदिपान्न भुमरे, पैठण आणि हरीभाऊ बागडे फुलब्री हे खासदार दानवे यांना मदत करतील, मात्र यातील एकही नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत काही ही भरीव कार्य केले नाही, म्हणून जरांगे यांनी आरक्षणाचा भावनिक मुद्दाकरून निवडणुक लढवली, तर त्यांना मतदारांची साथ मिळू शकते. तसेच जालना विधानसभा मतदारसंघ हा कैलास गोरंट्याल यांच्याकड़े असल्याने याठिकाणी बंजार आणि ओबीसी समाज मोठा आहे. येथून त्यांना मदत मिळू शकते, मात्र त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाची मोट बांधावी लागेल.

सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी होणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीकडे वानवा आहे. यातूनच विरोधी पक्षाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असतानाच जरांगे हा सक्षम पर्याय होऊ शकतो ही चर्चा जालन्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. तसेच जरांगे आणि मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्लाची सहानुभूती मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जरांगेची भेट घेतली होती. परंपरेने हा मतदारसंघ आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे आहे, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने अथवा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीने आपल्याकडे घेतला आणि जरांगे पाटील यांचे मन ओळवून उमेदवारी दिली, तर हा मतदारसंघ राखता येईल.

रावसाहेब दानवे राजकारणात वाकबगार नेते:
रावसाहेब दानवे निवडणुकीच्या राजकारणात वाकबगार मानले जातात. १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. भाजपासोबतच विरोधी पक्षांतील अनेक लहान-मोठ्या नेत्यांशी त्यातही काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गेल्या निवडणुकीपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत होती. या वेळेस शिवसेना (उद्धव ठाकरे) त्यांच्यासोबत असणार नाही. या नवीन राजकीय समीकरणाने भाजप म्हणजेच रावसाहेब दानवे यांची मते किती कमी होतील याचे राजकीय आखाडे बांधणे सुरू आहे.
सलग पाच निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशीच झालेली आहे. दानवेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवार जरांगे पाटील दिला गेला तर सर्वाधिक चुरशीची लढत होईल. यापूर्वी दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात सर्वाधिक चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी काळे फार कमी फरकाने म्हणजे एक हजार ८३८ मतांनी पराभूत झाले होते.

प्रकाश आंबेडकर फॅक्टर महत्वाचा ठरेल:
नुकतेच आरक्षणासंदर्भात बहुजन आघाडीचे नेते श्री प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला जरांगे पाटील यांनी ऐकला आणि तो आमलात ही आणला. त्यामुळे अनुसुचित जातीची सहानुभूती मिळण्याची त्यांना शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. महाविकास (इंडिया) आघाडीत ही जागा बहुजन आघाडी ही सोडवून घेऊ शकते. मोठ्या प्रमाणात असलेला मराठा आणि जोडीला बहुजन व एसी समाज आल्यास ही जागा जिंकता येईल.

१९९९ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे होते. त्या वेळेस या दोन्ही पक्षांचा पराभव करून भाजपचे रावसाहेब दानवे पहिल्यांदाच लोकसभा सदस्य पदावर निवडून आले होते. २०२४च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नावे चर्चेत आली आहेत. आमदार राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात नसून परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. परंतु जालना लोकसभा उमेदवारीचा विषय निघाला की त्यांच्या नावाची चर्चा पक्षात हमखास असते. भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे नावही चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून ते तीन वेळेस आमदारपदी निवडून आले होते. त्यांचे वडील कै. पुंडलिकराव दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. याशिवाय पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे नावही इच्छुक उमेदवारांमध्ये घेतले जात आहे.
(साभार – संजय चव्हाण यांच्या फेसबुक पोस्टवरून  )

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम