शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे! या नावाचा दरारा असाच असला पाहिजे! – वरुण सरदेसाई

मुंबई – महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची (Andheri East Bypoll Election) चर्चा आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला असताना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली.

ही निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार होता. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून (BJP) या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली होती , तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली होती.

परंतु आता मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. या राजकीय घटनेबद्दल आता प्रतिक्रिया येत आहेत.

युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी याप्रकरणी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे! ह्या नावाचा दरारा असाच असला पाहिजे!’, असे त्यांनी म्हटले आहे.