अमृता फडणवीस यांनी देहविक्री व्यवसायाबाबत केलेल्या मागणीवरून विकास लवांडे यांची भाजपवर टीका  

पुणे –   माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amrita Fadnavis) यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ (Prostitution business) म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली.जर्मनीसारखेच भारतातही वेश्या व्यवसायाकडे आदराने पहावं असं त्यांनी म्हटलंय. भाजप (BJP) नेहमीच तुमच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना यावेळी बोलून दाखवलं.

अमृता फडणवीस म्हणाल्या, मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका. असं देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान,  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी या मुद्द्यावरून अमृता फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, ही कोणती मनोवृत्ती आहे ? हेच का भाजपचे #हिंदुराष्ट्र ??#नमो महाराज बहुमत आहेच तर करा कायदा , भक्तांनो जय श्रीराम म्हणा असं लवांडे म्हणाले आहे.

दरम्यान, प्रौढांच्या सेक्स वर्कर्सच्या (Sex workers) कामात आणि संमतीने सेक्स करणाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी त्याच्यावर फौजदारी गुन्ह्याखाली कारवाईही करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. लैंगिक कार्याला व्यवसाय म्हणून मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने या व्यवसायाला कायद्याने सन्मान आणि संरक्षणही मिळायला हवे, असे म्हटले आहे.