जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू – परब

मुंबई – दिवाळीपासून बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दणका देत 11 हजार कंत्राटी नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला ( Contract Staff will appoint In MSRTC ) आहे. तसेच आजपर्यंत कामावर हजर झाले नाहीत अशा कामगारांवर नियमानुसार निलंबन, बडतर्फ तसेच सेवा समाप्तीची कारवाई करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी सांगितले.

आतापर्यंत सात वेळा मी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आणि त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचं आवाहन केलं. परंतु प्रशासन फक्त सांगतंय आणि करत काहीच नाही, असा एक समज झालाय. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करतोय. याशिवाय आम्ही ११ हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची नेमणूक करण्याचं आमचं टेंडर तयार आहे, त्यासंदर्भात आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ,असं अनिल परब यांनी सांगितलं.

जे कर्मचारी उद्यापासून कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू. वारंवार आवाहन करूनही ते कामावर हजर राहत नाहीत. कोर्टाने त्यांच्यावर कारवाई न करण्याबद्दल कोणतेही आदेश दिलेले नाही. कोर्टाने दिलेल्या निर्णयासंदर्भात आम्ही कॅबिनेटची मंजुरी घेतली आहे. ती मंजुरी घेतल्यानंतर आता आम्ही अॅफिडेविट कोर्टात सादर केली आहे,अशी माहिती त्यांनी दिली.