जगभरात चाहते असणाऱ्या ओशोंच्या मृत्युच्या दिवशी नेमके काय घडले होते ? 

पुणे  – ओशो कोण आहेत? हा प्रश्न आजही लाखो लोकांच्या मनात निर्माण होतो, कोणी ओशोंना संत-सतगुरुंच्या नावाने ओळखतात तर कोणी देवाच्या नावाने. काहींसाठी ओशो हे केवळ तत्त्वज्ञ आहेत तर काहींसाठी विचारवंत. ओशो काहींसाठी शक्ती आहेत आणि काहींसाठी व्यक्ती. काही जण त्यांना ज्ञानी गूढवादी म्हणून संबोधतात, तर काहींच्या दृष्टीने ओशो हे ‘सेक्स गुरू’चे नाव आहे.

ओशो यांच्या मृत्यूनंतर एवढी वर्षे उलटून सुद्धा त्यांच्या मृत्यूबाबत अनेकदा उलटसुलट चर्चा होताना दिसून येते. (What exactly happened on the day of Osho’s death?) ओशोंच्या मृत्यूवर ‘हू किल्ड ओशो’ (Who Killed Osho) हे पुस्तक लिहिणारे अभय वैद्य म्हणतात, १९ जानेवारी १९९० रोजी डॉ. गोकुळ गोकाणी यांना ओशो आश्रमातून फोन आला. त्यांना सांगण्यात आले की तुझे लेटर हेड आणि इमर्जन्सी  किट आण. डॉ. गोकुळ गोकाणी (Dr. Gokul Gokani) यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे की,मी 2 वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचलो. त्यांच्या शिष्यांनी सांगितले की ओशो त्यांच्या देहाचा त्याग करत आहेत. तुम्ही त्यांना वाचवा. पण मला त्यांच्याकडे जाण्याची परवानगी नव्हती. अनेक तास मी आश्रमात फिरलो.  नंतर थोड्या वेळाने मला त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली आणि मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यास सांगण्यात आले.

ओशोंच्या मृत्यूच्या वेळेबाबतही डॉक्टर गोकुळ प्रश्न उपस्थित करतात. ओशोंच्या शिष्यांनी त्यांच्यावर हृदयविकाराचा झटका असे मृत्यूचे कारण लिहिण्यासाठी दबाव आणल्याचा दावाही डॉक्टरांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. ओशोंच्या आश्रमात संन्यासीचा मृत्यू उत्सव म्हणून साजरा करण्याची प्रथा होती. पण जेव्हा ओशो स्वतः मरण पावले तेव्हा घोषणेच्या तासाभरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या निर्वाणाचा सोहळाही थोडक्यात ठेवण्यात आला.

दरम्यान, ओशोंच्या आईही त्यांच्या आश्रमात राहत होत्या. ओशोच्या सेक्रेटरी असलेल्या नीलम यांनी नंतर त्यांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ओशोंच्या मृत्यूची माहिती त्यांच्या आईला खूप उशिरा मिळाली. नीलमने या मुलाखतीत दावा केला होता की, ओशोंची आई बराच वेळ म्हणत राहिली की त्यांनी त्याला अखेर मारले.