अजितदादांच्या एका निर्णयामुळे केवळ राष्ट्रवादीतच नव्हे तर पवार कुटुंबातही फूट पडली

पुणे – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राजभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला असताना आता पवार घराण्यात देखील फुट पडल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली नसून थेट पवार घराण्यात फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. या फुटीमध्ये एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार असं चित्र आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती. ती प्रत्यक्षात आली. अजित पवारांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चाळीसच्या आसपास आमदार असल्याचा दावा केला असून आपण म्हणजे राष्ट्रवादी असा एक संदेश दिल्याचं सांगितलं जातंय. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. या सर्व घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.