म्हाडाचा ढिसाळ कारभार सुरूच; हास्यास्पद आणि नियोजनशून्य कारभारापुढे परीक्षार्थी हतबल

Mumbai – म्हाडाने (MHADA ) जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या मात्र भरतीची अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. खरतर राज्यात सत्तांतर झाल्यावर राज्याला अतिशय कार्यक्षम असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले मात्र त्याचा काहीही फायदा या परीक्षार्थींना झाला नसल्याचे दिसत आहे. म्हाडाचा कारभार पूर्वीप्रमाणेच संथपणे आणि ढिसाळपद्धतीने सुरु असल्याचे दिसत आहे.

म्हाडाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक परीक्षार्थींचे भविष्य टांगणीला लागले असल्याच्या आजपर्यंत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील मात्र आता आम्ही जे तुमच्या निदर्शनास आणून देणार आहोत ते वाचून म्हाडाचा कारभार कसा सुरु आहे हे लक्षात येईल. म्हाडा प्राधिकरणात 2015 नंतर तब्बल 7 वर्षानी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये अर्ज भरून घेऊन जी परीक्षा डिसेंबरमध्ये होणार होती त्या भरती प्रक्रियेतील घोटाळा उघड झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीऐवजी म्हाडाने स्वतः ही परीक्षा घ्यावी असे आदेश सरकारने दिले. त्यानुसार म्हाडाने नामांकित टीसीएस कंपनीची नियुक्ती करून ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान अर्ज भरून घेतलेल्या जागांसाठी जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या.

दरम्यान, या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये जाहीर होऊन, जून महिन्यात कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली मात्र ढिसाळ आणि संथ कारभार करण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या या विभागाने अंतिम निवड यादी जाहीर करण्यासाठीसुद्धा कित्येक महिने घेतले. आता कसं तरी या परीक्षार्थींना नियुक्तीपत्र मिळेल असे वाटत असताना आता यातही म्हाडाचा गोंधळ दिसून येत आहे. येत्या तीन तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मोठा गाजावाजा करून नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचं नुकतेच जाहीर करण्यात आले होते मात्र आता एकूण 14 कॅडर्स पैकी फक्त नऊच कॅडर्सच्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

खरंतर आधी म्हाडाने अंतिम निवड यादीत नाव असणाऱ्या सर्वाना अधिकृतपणे ३ तारखेच्या या कार्यक्रमाला हजर राहण्याबाबत कळवले होते मात्र ऐनवेळी कुठे माशी शिंकली कुणास ठावूक आता काही ठराविकच उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचा घाट म्हाडाने घातला आहे. या सर्व घडामोडी पाहून आता उमेदवार देखील चांगलेच नाराज झाले असून म्हाडाच्या या हास्यास्पद आणि नियोजनशून्य कारभारापुढे हतबल झाले आहेत. हा गोंधळ अजून किती दिवस चालणार आणि या परीक्षार्थींना न्याय आणि नियुक्ती कधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.