मुंबईतील वायूप्रदूषण रोखण्याचा कृतीआराखडा कधी अंमलात येणार? आमदार भातखळकर यांचा सवाल

मुंबई – मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबतचा कृती आराखडा कधीपासून अमलात येणार असा सवाल भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील आमदार व पालिका अधिकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून वायू प्रदूषणाबाबतच्या कृती आराखड्याची माहिती देण्यात येईल अशी ग्वाही दिली.

मुंबई शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाबाबत विधानसभेत बोलत असताना, आ. भातखळकर यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याने हवा प्रदुषणाबाबतच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली असल्यास त्याची सद्यस्थिती काय? सदरचा कृती आराखडा सरकार माहीती साठी लोकप्रतिनिधी आणि जनतेला उपलब्ध करून देणार आहे काय? मुंबईतील १४ हवा तपासणी केंद्र कधीपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार? व संयुक्त राष्ट्रांच्या धर्तीवर वायू प्रदूषण रोखण्यासाठी कार्बन क्रेडीट योजना राबवण्याचा सरकारचा विचार आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले. यावर पालकमंत्री केसरकर यांनी सकारात्मक उत्तर दिले.

सरकार वायू प्रदूषणाच्या मुद्याबाबत गंभीर आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या आराखड्याला २०२० मध्येच मंजूरी दिलेली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा तपासणारी यंत्रे लवकरच कार्यान्वित करण्यात येतील. जानेवारीत या सर्व मुद्यांबाबत सखोल चर्चा करण्यासाठी पालिका प्रशासन व मुंबईतील आमदार अशी संयुक्त बैठक आयोजित करून कृती आराखड्याची तसेच शासनाकडे प्राप्त झालेल्या नवीन यंत्रणेबाबतची माहिती देण्यात येईल असे सांगितले. पालकमंत्र्यांच्या या सकारात्मक उत्तराबद्दल धन्यवाद व्यक्त करून भातखळकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व्यक्त केले.