“पुजारालाच का बळीचा बकरा बनवलं जातं?” गावसकरांनी संघ निवडीवरून रोहित-विराटवर साधला निशाणा

India vs West Indies: बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India Tour Of West Indies) भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांना प्रथमच भारतीय कसोटी संघात बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी मुकेश कुमार दोन्ही फॉरमॅटच्या संघात आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, कॅरेबियन दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून अनेक मोठे चेहरे गायब आहेत, त्यात सर्वात मोठे नाव चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फ्लॉप झालेल्या चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पुजाराची कामगिरी निराशाजनक होती आणि दोन्ही डावात अत्यंत खराब फटके खेळून तो बाद झाला होता. विजेतेपदाच्या लढतीतील फ्लॉप कामगिरीनंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्याची मागणी सातत्याने होत होती.

आता वेस्ट इंडिजविरुद्ध पुजाराला संधी न दिल्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सांगितले, “होय, तो काउंटी क्रिकेट खेळत असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत त्याला संघात कसे परत यायचे हे माहित आहे. ३९ किंवा ४० वर्षांपर्यंत लोक कसोटी खेळू शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही कारण आताचे सर्व खेळाडू हे खूप फिटनेसविषयी जागरूक असतात. जोपर्यंत तुम्ही धावा करत आहात आणि विकेट्स घेत आहात, तोपर्यंत वय ही मोठी समस्या असू नये असे मला वाटत नाही.”

माजी भारतीय कर्णधार गावसकरांनी विराट आणि रोहितच्या निवडीवरून बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली. ते म्हणाले की, “कर्णधाररोहित शर्मा(१५ आणि ४३),विराट कोहली(१४ आणि ४९) आणिशुबमन गिल(१३ आणि १८) हे देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या सामन्यात अपयशी ठरले होते परंतु केवळ पुजारालाच बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला? नेहमी त्यालाच बळीचा बकरा का बनवण्यात येते?”

मी स्पष्टपणे सांगतो जो नियम पुजारा लावला तोच नियम तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्माला का नाही लावला? फक्त एक व्यक्ती वगळण्यात आली आहे बाकीचे काय यशस्वी झाले आहेत? माझ्यासाठी फलंदाजी अपयशी ठरली. अर्थात, दोन्ही डावात ८९ आणि ४६ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेशिवाय इतर कोणीही धावा केल्या नाहीत. त्यामुळे कोहली आणि रोहितला ही संघाच्या बाहेर काढायचे होते.” अशा शब्दांत गावसकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.