कसब्यात भाजपचाच विजय होईल असा विश्वास गिरीश बापट यांना का वाटतोय? 

Pune Bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराची (pune bypoll election)रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी यात्रेवर भर आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे  रविंद्र धंगेकर या दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकंदरीत या निवडणुकीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे बिग बॉस खासदार गिरीश बापट यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

यावेळी कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, असं आश्वासनच गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा शब्द गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपलेच उमेदवार विजयी होतील, असे बापट यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले.

दरम्यान, आपण गिरीश बापट असं का म्हणाले याचा  थोडक्यात आढावा घेणार आहोत. कसबा हा भाजपचा गेल्या काही वर्षात बालेकिल्ला बनला आहे. कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. कसब्यात पाच वेळा गिरीश बापट हे आमदारकीला निवडून आले आहेत. सध्या ते भाजपचे विद्यमान खासदारआहेत.त्यानंतर मुक्ता टिळक यांनी २०१९ ची निवडणूक जिंकत भाजपचे वर्चस्व राखलं आहे.

बापट यांचा सर्वसामान्य नागरिकांशी दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या शब्दाला या मतदारसंघात विशेष महत्व आहे. हेमंत रासने हे गिरीश बापट यांच्याच तालमीत तयार झालेले नेते आहेत. ते बापट यांना आपल्या गुरुस्थानी मानतात याचा मोठा फायदा त्यांना होऊ शकतो. याशिवाय या भागात भाजप ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, छोट्या-मोठ्या हिंदुत्ववादी संघटना यांचे देखील मोठे नेटवर्क आहे. याशिवाय गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते चारवेळेस नगरसेवक म्हणून काम केलेले आणि स्थायी समितीचे अनेकदा अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांना पक्षाने संधी दिल्याने गणपती मंडळांची देखील साथ हेमंत रासने यांनाच मिळण्याची शक्यता आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे विरोधक ब्राह्मण समाज नाराज असल्याचा दावा करत आहेत मात्र यात नेमके किती तथ्य आहे हे नेमकेपणाने कुणीही सांगू शकत नाही. आणि जरी हा समाज काहीप्रमाणात नाराज असला तरीही ती नाराजी दूर करण्याचे काम गिरीश बापट करू शकतात. यामुळेच त्यांनी हे आश्वासन दिले का या कोनातून देखील याकडे पाहता येईल.

दरम्यान,  मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनामुळे कसब्याच्या निवडणुकीत बापट स्वत: लक्ष घालणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मतदार संघाची संपूर्ण माहिती असलेला दिग्गज नेता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखादे आश्वासन देतो म्हणजे १०० टक्के काहीतरी अभ्यास करून तसेच विचार करूनच हे आश्वासन दिले असणार त्यामुळे भाजपसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.