“मनसेनं २०१९ला तिकीट कापलं होतं, आता पक्षाने आदेश दिला तर…” कसबा निवडणुकीसाठी रुपाली पाटील सज्ज

पुणे- भाजपच्या दिवंगत नेत्या आणि पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. अशातच ‘राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे नुकतेच कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले आहे. त्यामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघाची जागा रिकामी आहे. अशात या जागेवर पोटनिवडणुक होऊ शकते. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली पाटील (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, ‘ मुक्ता टिळक यांचं आजारांनं निधन झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार आहे. मुक्ताताई २०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्यापासून आजारी होत्या. मुक्ता टिळक या आजारी असताना त्यांनी शक्य तेवढं काम केलं’.

‘अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. कोणाचं दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो. भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत, पंढरपूर, मुंबईमध्ये पोटनिवडणुक झाल्या. कसबा मतदारसंघात असंही काम झाली नाहीत. खासदारही आजारी आहेत. मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. त्यात मुळात २०१९ साली मनसेने माझं तिकीट मुक्ता टिळक यांच्यासाठीच कापलं होतं’, असा खुलासा रुपाली पाटील यांनी केला.

रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार?, पोटनिवडणुकीत उमेदवार देणार का?, हे पाहावे लागणार आहे.