निवडणूक आयोगाला एवढी कशाची घाई लागली आहे ? प्रियांका चतुर्वेदी यांचा थेट सवाल 

मुंबई – महाराष्ट्रात राजकीय गोंधळानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र आता शिवसेना (ShivSena) हे नाव घेण्यासाठी उद्धव सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांच्यात लढा सुरू आहे. खरे तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह हीच पक्षाची ओळख बनवायची आहे. या लढ्यादरम्यान खरी शिवसेना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे.

न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाला एवढी कशाची घाई लागली आहे, असा सवाल शिवसेनेच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी केला आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबतची माहिती दिली. आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस दिली. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे? निवडणूक आयोगाला एवढी घाई का? निवडणूक आयोगाने जी नोटीस पाठवलीये त्याविरोधात आम्ही कोर्टात याचीका दाखल केली आहे. प्रकरण प्रलंबित असताना नोटीस का?, असा सवाल या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली लागेपर्यंत निवडणूक आयोगाने या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही करू नये. तसे आदेशच निवडणूक आयोगाला देण्यात यावेत, अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं चतुर्वेदी यांनी सांगितलं.