वानखेडेला एनसीबीमधून बदलण्यात आले हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला – नवाब मलिक

मुंबई : समीर वानखेडे यांना एनसीबीमधून बदलण्यात आले आहे हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एनसीबीमध्ये आल्यानंतर फर्जीवाडा करुन अनेक चांगल्या लोकांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकले. नोकरी मिळवण्यासाठी फर्जी प्रमाणपत्र घेऊन नोकरी घेतली. कमी वयात बारचे लायसन्स घेतले ही सगळी प्रकरणे उघड केली. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. याशिवाय खंडणीच्या प्रकरणात दोन – दोन एसआयटी तपास करत आहेत. दिल्ली विजिलिएन्स समितीकडेही तक्रार केल्यानंतर त्यांचा रिप्लाय आला आहे. प्रथमदर्शनी वानखेडेने सर्व्हिस कोडचे उल्लंघन केले आहे हे स्पष्ट होते आहे. या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून हा विषय धसास लावणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

समीर वानखेडेला मुदतवाढ मिळावी म्हणून दिल्लीत लॉबिंग करण्यात येत होते हे कालच जाहीर केले होते. त्यानंतर रात्रीच वानखेडेला बदलण्यात आल्याचे समजले. लॉबिंग करणार्‍या व्यक्तीने माघार घेतली हे यावरून स्पष्ट होते आहे. समजा मुदतवाढ दिली असती तर संपूर्ण माहिती घेऊन प्रकरण उघड करणार होतो असेही नवाब मलिक म्हणाले.

आर्यन खान प्रकरणात दोन्ही एसआयटी तपास करत आहेत त्यात काही अडचण येत असेल तर त्याचीही विचारणा करण्यात येईल. प्रभाकर साहीलने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा त्या घटनेचा योग्य तो तपास करुन कारवाई करेल असेही नवाब मलिक म्हणाले.

जाता – जाता माझ्याबाबतीत वेगळा प्रकार घडवण्याचा प्रकार होता. पोलिसांकडे माझ्या विरोधात तक्रार मेलद्वारे केली असेल तर माझ्यासह चौकशी करा किंवा माझ्याविरोधात कुठल्या अधिकार्‍याने तक्रार करण्यास कुणाला प्रोत्साहित केले असेल तर त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.