महिला पत्रकारांना कपडे कसे घालावेत हे सांगणाऱ्या सुप्रियाताई उर्फी प्रकरणात गप्प का?

पुणे – अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील शीतयुद्ध दिवसेंदिवस पेट घेत आहे. सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप (Chitra Wagh vs Urfi Javed) घेतला आहे. या वादाची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात चर्चा सुरू आहे. अगदी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून ते तृप्ती देसाई,शीतल म्हात्रे यांनी आपले मत मांडले आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि महिला नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणी मौन बाळगल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी महिला पत्रकार साडी का नेसत नाहीत?, असा सवाल करणाऱ्या सुप्रिया सुळे उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादावर मात्र एक शब्दही बोलल्या नाहीत. ‘मराठी वृत्त वाहिन्यावरील मुली मराठी बोलतात मग मराठी संस्कृतीची साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्न कल्चर का आत्मसात करतोय’, असं सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या.

त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठे वादंग निर्माण झाले होते. परंतु महिला पत्रकारांच्या कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्या सुप्रिया सुळेंना उर्फीच्या अर्धनग्न कपड्यांवर किंवा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर काहीही बोलायचे नाही, असे दिसत आहे. जवळपास गेल्या २ आठवड्यांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेदचे आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी शांत राहणेच पसंत केले आहे असे दिसत आहे.

महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या प्रकरणी आपले मत मांडताना चित्रा वाघ यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. ‘चित्रा वाघ या स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उर्फीला टार्गेट करत आहेत. उर्फी अल्पसंख्याक जातीतील असल्याने तिच्यावर निशाणा साधला जात असल्यास हे आताच थांबले पाहिजे’, असे तृप्ती देसाईंचे म्हणणे होते.