तेजस ठाकरे दसरा मेळाव्यातून करणार आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात ?

मुंबई – दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. दसरा मेळाव्याकरता बीकेसीतील एक मैदान शिंदे गटानं आरक्षित केलं आहे.

ठाकरे गटाला अद्याप दसरा मेळाव्यासाठी कोणतही मैदान मिळालेलं नाही, त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. येत्या दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरे हे राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

तेजस ठाकरे यांच्या राजकीय इनिंगची शिवसैनिकांना मोठी प्रतीक्षा आहे. यातच आता तेजस ठाकरे यांना युवासेनाप्रमुखपदाची जाबाबदारी मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र शिवसेनेच्या वतीने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया याबाबत अद्याप देण्यात आलेली नाहीये.