खळबळजनक : राष्ट्रवादीच्या ‘या’ धडाडीच्या तरुण नेत्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या विरोधात डिझेल अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस (Police) ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात कारखान्याचे सभासद संजय पाटील यांनी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार नुकताच भगीरथ भालके, तत्कालीन कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे, सरकोली येथील पेट्रोल पंप मालकासह चार जणांवर 420 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असतानाही कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके व तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे यांनी सरकोली येथील भैरवनाथ पेट्रोल पंपावरुन कारखान्याच्या नावे खोट्या पावत्या तयार करुन 16 हजार लिटर डिझेलची खरेदी केल्याचे दाखवून 8 लाख 36 हजार 53 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार संजय पाटील (रा.रोपळे ता.पंढरपूर) यांनी न्यायालयात केली होती.

त्यानुसार न्यायालयाने सर्व पुराव्याची पडताळणी करुन भालके व कर्पे यांच्यासह पंपाचे मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलींद पाटील हे करीत आहेत. कारखाना निवडणुकीच्या तोंडावर भालके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.