‘राज्यात कॉंग्रेसला ‘विरोधी पक्षनेता’ देता आला नाही आणि म्हणे आम्ही २६ पक्ष एकत्र येऊन मोदींना पर्याय देणार’

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. पण विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची निवड करायची यावर नवी दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर आठवडाभर विचारमंथन सुरू असल्याने या पदावर काँग्रेसला अद्यापही दावा करता आलेला नाही.

विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक आहे त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या 44 जागा असलेला काँग्रेस पक्ष हाच सर्वाधिक संख्या असलेला विरोधी पक्ष आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेता कॉंग्रेसचाच होणार असं दिसत आहे. काँग्रेसमध्ये नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा आहे.

दरम्यान, या घडामोडींवर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी भाष्य केले आहे. इथे अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला तरी कॉंग्रेसला ‘विरोधी पक्षनेता’ देता आला नाही आणि म्हणे आम्ही २६ पक्ष एकत्र येऊन मोदींना पर्याय देणार असं म्हणत भोसले यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडवली आहे.