‘राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर राज्यपालपदी राहण्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ’

मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालमहोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असेही अजित पवार म्हणाले.

राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली.