गाडी थांबवली, उद्धट भाषा वापरली…; सिन्नर टोलनाक्यावर नेमकं काय घडलं? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे (MNS leader Amit Thackeray) हे सध्या नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री अमित ठाकरे यांना सिन्नर येथील टोल नाक्यावर अर्धा तास तिष्ठत उभं राहावं लागलं. अमित ठाकरे यांचा हा अपमान सहन न झाल्याने मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नर कडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला.

टोलनाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा दावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराचा निषेध म्हणून हा टोलनाका फोडल्याचे मनसेने सांगितले आहे. दरम्यान आता स्वत: अमित ठाकरे यांनी सविस्तर खुलासा केला आहे.

“शिर्डीत (Shirdi) साईबाबांच्या दर्शनानंतर वैयक्तिक कामासाठी समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) नाशिकला निघालो होतो. महासंपर्क अभियानाच्या दौऱ्यात पोलीस बांधव थकल्याने मी त्यांना शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात विश्रांती करण्यास सांगितले. यावेळी टोलनाक्यावर फास्टटॅगमधून टोल कट न झाल्याने दहा ते पंधरा मिनिटं टोल कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली.”

“आम्ही त्यांना टेक्निकल इशू बाबत सांगितलं मात्र कर्मचारी उद्धट भाषा वापरत होते. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की हे अमित ठाकरे (Amit Thackeray) आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाला देखील फोन लावला. मात्र व्यवस्थापक देखील उद्धट भाषा वापरत होता. पंधरा ते वीस मिनिट गाडी थांबवून ठेवली आणि नंतर सोडली.”

सिन्नर येथील मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी टोल नाका फोडला. मला नाशिकला पोहोचल्यावर कळलं की कार्यकर्त्यांनी टोल फोडला.” असे अमित ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी पुढे बोलताना “राज साहेबांमुळे 65 टोल बंद झाले आणि माझ्यामुळे त्यात आणखी एकाची भर पडली. टोल कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरल्यामुळे कार्यकर्त्यांनी टोल फोडला…” असे स्पष्टिकरण अमित ठाकरे यांनी दिले. (Latest Marathi News)