अमोल मिटकरी निधीसाठी कमिशन घेतात, पदाधिकाऱ्यांची थेट जयंत पाटलांकडे तक्रार…

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आढावा घेतला. या आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून निधी मिळत नाही, दिला तर त्यावर कमिशन मागितले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.( Amol Mitkari takes commission for funds ?)

अमोल मिटकरी यांनी आतापर्यंत जिल्ह्यात 50 कोटींचा निधी आणला, पण पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, जिल्हाध्यक्षांना निधी देताना आमदारांनी कमिशन मागितल्याचा आरोपही खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे केला आहे. याशिवाय, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनीही विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे आढावा बैठकीत केली.