संतांनी स्त्रियांना कीर्तनकारांच्या रुपात सन्मान प्राप्त करुन दिला – चारुदत्त आफळे  

पुणे : ज्यावेळी समाजात स्त्रियांना दुय्यम मानले जात होते, त्यावेळी त्याच समाजात स्त्रियांना प्रतिष्ठीत करुन कीर्तनकाराच्या रुपात सिद्ध करीत त्यांना संतांनी सन्मान प्राप्त करुन दिला. संत इतिहासामध्ये स्त्री संतांची मोठी परंपरा आहे. यातील अनेक स्त्रिया या केवळ संतपदावर पोहोचल्या असे नाही, तर कीर्तनाद्वारे प्रबोधन करीत आहेत, असे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे यांचे संत वेणास्वामी याविषयावर सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चारुदत्त बुवा आफळे म्हणाले, संत जनाबाई यांनी सुद्धा कीर्तनसेवेत सहभाग घेतल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. याच परंपरेमध्ये संत मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश करणे, हेही एक हरिकीर्तन आहे. गोपिचंद राजाला त्याच्या मातेकडून अनुग्रह मिळाला, हा देखील स्त्री संत कीर्तनाचा दाखला मानता येईल.

ते पुढे म्हणाले, आजही अनेक वर्षांनंतर कीर्तन परंपरा सुरु आहे. आजच्या विद्यमान कीर्तनकारांमध्ये महिला कीर्तनकाराची संख्या ४० टक्क्यांच्या वर आहे, ही देखील मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यातील अनेक स्त्रिया केवळ कीर्तनकार नसून कीर्तन शिक्षीका देखील आहेत. त्यामुळे ही परंपरा अशीच पुढे देखील उत्तरोत्तर वाढत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.