लडाखमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळून ९ जवान शहीद

लडाख – लडाखमध्ये (Ladakh Army Truck Accident) काल संध्याकाळी भारतीय सैन्याच्या एका ट्रकला भीषण अपघात झाला. यामध्ये 9 जवानांना आपले प्राण गमवावे लागले असून, एकजण गंभीर जखमी आहे. लेहहून न्योमाला जात असताना कैरी गावाच्या 6 किलोमीटर अलीकडे सैन्याचा ट्रक खोल दरीत कोसळल्यामुळं हा अपघात झाला असल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

यामध्ये 8 जवान आणि एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. 34 जवान असलेला ट्रक, एक जीप आणि एक रुग्णवाहिका असा ताफा रस्त्यानं जात असताना, या ताफ्यातील 10 जवानांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला. या अपघाताबद्दल राष्ट्रपति, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

हे गाव भारत आणि चीनच्या सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) लागून आहे. दऱ्याखोऱ्यांचा आणि अवघड घाटांचा हा भाग रहदारीसाठी अवघड आहे. हा भाग एलएसीजवळ असल्याने येथे अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था आहे. भारतीय लष्कराच्या अनेक रेजिमेंट्स सध्या लेह भागात आहेत. सीमेवर चीनबरोबर सुरू असलेला तणाव लक्षात घेता या भागात सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे.