पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणी भाजपा नगरसेवक व सहकार्यांची निर्दोष मुक्तता!!

Pune- पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत भा.सिरसाळकर यांनी सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, पुणे प्रभागातील भाजपाचे नगरसेवक श्रीकांत जगताप त्यांचे सहकारी अनिकेत राजेंद्र जगताप वय-३२, हेमंत रत्नाकर जगताप वय-३८, महेश आनंदराव काटे वय-३७, जयनाथ वसंतराव जगताप वय-४६ व शैलेश सोनबा चव्हाण सर्व रा. हिंगणे खुर्द,सिंहगड रोड, पुणे यांची सुरक्षारक्षक म्हणून बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी यांना मारहाण, शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

खटल्याची हकीकत थोडक्यात- दिनांक ०४/०६/२०१२ रोजी पोस्ट खात्याची रोकड रक्कम वाहक सरकारी गाडीवर सुरक्षारक्षक म्हणून बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी श्री.अमित संपत पवार वय- ४५ हे सिटी पोस्ट पुणे येथून पोस्ट खात्याची रोकड रक्कम घेऊन सिंहगड रोड येथील आनंदनगर, हिंगणे खुर्द पोस्ट ऑफिस मध्ये सरकारी गाडी घेऊन आले असताना, पोस्टाची सरकारी गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी अमित पवार व पोस्टचे काही कर्मचारी यांना अनिकेत जगताप यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पोलिस कर्मचारी पवार यांच्या खाकी वर्दीचा शर्टाची काॅलर धरून गचुंडे धरले, गालावर, मानेवर, खांद्यावर चापटी मारल्या, शर्टचे बटणं तोडले, नेमप्लेट तोडली, पोस्टाच्या सरकारी गाडीवर दगडफेक करून सरकारी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर अनिकेत जगताप यांनी नगरसेवक श्रीकांत जगताप व इतर साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. पोलीस कर्मचारी पवार यांना वरील सर्वांनी मारहाण केली. त्यातील दोघा तिघांनी गाडीतील कॅश घेण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद हवेली पोलिस ठाण्यात दिली होती.

हवेली पोलिसांनी दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कर्मचाऱ्याला दमदाटी करणे, मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे भादवी १४३, १४७, १४९, ३५३, ३२३, ३३६, २४९, ५०४, ५०६, २९४ अन्वये कलमे लावून भाजपाचे नगरसेवक श्रीकांत जगताप व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.

सरकार पक्षाने तीन साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदवल्या. घडलेला घटनाक्रम साक्षीदारांनी न्यायालय समोर जसा घडला तसा शपथेवर कथन केला. ॲड.मिलिंद द.पवार यांनी सर्व आरोपींच्या बाजूने बाजू मांडली.

घटनेच्या वेळी दहा ते पंधरा अनोळखी इसमांनी पोलिस कर्मचारी पवार यांना मारहाण केली. त्यामुळे घटनास्थळी झालेल्या गर्दीमध्ये नेमकी मारहाण कोणी कोणाला केली हे सांगता येणार नाही. घटना स्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी न्यायालयासमोर आणलेले नाहीत. पोलिस कर्मचारी यांचा फाटलेला खाकी शर्ट न्यायालयात पोलिसांनी जमा केलेला नाही. पोलिस कर्मचारी यांना मारहाणीत झालेल्या जखमांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पोलीसांनी न्यायालयात सादर केलेले नाहीत. श्रीकांत जगताप हे भाजपाचे नगरसेवक आहेत. राजकीय वैमनस्यातून पोलिस कर्मचारी पवार यांना खोटी फिर्याद देण्यास काही तत्कालीन नेत्यांनी भाग पाडले व श्रीकांत जगताप यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना या खटल्यामध्ये खोटे गुंतविले आहे. असा युक्तिवाद ॲड.मिलिंद द.पवार यांनी केला.युक्तिवाद ग्राह्य धरून वरील सर्व आरोपींची पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यामध्ये ॲड.आकाश देशमुख व ॲड सुयोग गायकवाड यांनी सहाय्य केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?