ऋतुराज गायकवाडचं ठरलं! सीएसकेचा मराठमोळा शिलेदार आयपीएलनंतर अडकणार लग्नाच्या बेडीत

आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बहुप्रतिक्षित आयपीएल अंतिम सामना (IPL 2023 Final) रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujrat Titans) संघात हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी सीएसकेचा शिलेदार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याबद्दल आनंदाची बातमी पुढे आली आहे. ऋतुराज आयपीएलनंतर बोहल्यावर (Ruturaj Gaikwad Marriage) चढणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना (WTC Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, स्टँडबाय खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) टीम इंडियासोबत लंडनला रवाना होणार नाही. त्याच्या जागी युवा खेळाडू यशस्वी जयस्वालला संघासोबत पाठवले जाईल.

ऋतुराज गायकवाड टीम इंडियासोबत लंडनला रवाना होणार नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, लग्नामुळे तो संघासोबत लंडनला जाणार नसल्याचे त्याने कळवले आहे. 5 जूनपासून तो संघात सामील होण्यास तयार आहे. “ऋतुराज गायकवाड याने आम्हाला त्याच्या लग्नाबाबत कळवलं. लग्नामुळे मला लंडनला लवकर निघता येणार नसल्याचं ऋतुराजने सांगितलं. पण मी टीमसोबत 5 जूननंतर जोडला जाईन, असंही ऋतुराज म्हणाला. मात्र हेड कोच राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली. त्यामुळे आता यशस्वी लवकरच लंडनला रवाना होणार आहे”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली.

परंतु ऋतुराजची होणारी पत्नी नेमकी कोण आहे, याबाबत अद्याप फलंदाजाने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ऋतुराजला क्लिन बोल्ड करणारी कोण आहे?, हे जाणून घेण्याची उस्तुकता सर्वांना लागली आहे.