भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी  काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप करत आहे :  कॉंग्रेस 

पणजी : भाजपने पुन्हा बेकायदेशीरपणे सत्तेत येण्याचा मार्ग शोधण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे फोन हॅक केल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. चोडणकर यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन भाजपने सत्तेचा गैरवापर करून फोन टॅपिंगचा प्रकार चालविला आहे असे म्हटले.

आपल्यासह, दिगंबर कामत आणि इतर काँग्रेस नेत्यांची गुप्तहेर केल्याबद्दल भाजप सरकारवर त्यांनी जोरदार टिका केली. यावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, काँग्रेस नेते मायकल लोबो, मोरेन ऱिबेलो, उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स उपस्थित होते.

गोव्यातील लोकांनी भाजपला घरी पाठवण्यासाठी मतदान केले आहे. हे जाणून भाजपने ‘फोन टॅपिंग’चे काम खासगी एजन्सीकडे सोपवून फोन हॅक केले आहेत. त्यांनी हे बेकायदेशीरपणे केले आहे, कायदेशीर असेल तर भाजपने परवानगी दाखवावी. असे चोडणकर म्हणाले.

या फोन टॅपिंगमध्ये गुंतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना बेकायदेशीर गोष्टी बंद कराव्यात. आम्ही त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू.असे चोडणकर म्हणाले.भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर करत आहे. भाजप लोकांच्या गोपनीयतेत ढवळाढवळ करत आहे. सत्तेत राहू इच्छिणारे भाजप नेते आमच्याशी संपर्क साधत आहेत कारण त्यांना माहित आहे की आम्ही सरकार बनवत आहोत.असे  त्यांनी नमूद केले.