भाजप खासदार वरुण गांधी यांची संजय राऊत यांनी घेतली भेट; तीन तास झाली चर्चा

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी (29 मार्च) रात्री ही बैठक झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजू शकलेला नाही.

दरम्यान, या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले,  वरुण गांधी हे नक्कीच ते माझ्याकडे आले होते. बरेच दिवस भेटीसंदर्भात वेळ मागे पुढे होत होती. ते एका राजकीय पक्षाचे नेते असले, खासदार असले आणि गांधी कुटुंबाशी (Gandhi Family ) संबंधित असले तरी ती सदिच्छा भेट होती. कोणत्याही भेटीत राजकीय विषय निघत असतात. तसा या भेटीतही निघाला. पण ही भेट सदिच्छा भेटच होती, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच या पुढेही आम्ही एकमेकांना भेटणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.