जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याचे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला असून यात भाषेची मर्यादा देखील अनेकदा ओलांडताना नेते मंडळी दिसत आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.

फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. यासोबतच ठाकरेंनी आपल्या भाषणात जहरी टीका भाजपवर केली.

दरम्यान, या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहात असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. देवेंद्रजींचं काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी पाहिलं आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.अशी जहरी टीका त्यांनी ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.