चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील १५ दिवसात परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

पुणे शहरातील चांदणी चौकात (Chandni Chowk, Pune) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात स्थानिक प्रवाश्यांनी साताराला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेत संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी करून प्रवाश्यांची समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार चांदणी चौक परिसराला भेटीनंतर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh), पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde), अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे (Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (Rahul Srirame), एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam), उपविभागीय अधिकारी संजय आसवले (Sanjay Aaswale) आदी उपस्थित होते.

पश्चिमेकडून येणाऱ्या ९ लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होते. हे लक्षात घेऊन बैठकीत लेनची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या सुरु असलेल्या कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश विक्रमकुमार आणि डॉ.देशमुख यांनी दिले.

पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांलयाकडून प्रत्येकी ५० असे एकूण १०० मार्शल वाहतूक नियंत्रणासाठी नेमण्यात येणार आहे. चांदणी चौकातील पूल नियंत्रीत ब्लास्टिंग पद्धतीने १५ दिवसात पाडण्यात येईल. त्यानंतर त्वरीत नवीन लेन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी पूलाजवळील पाणी पुरवठ्याच्या वाहिनीला पर्यायी वाहिनीचे काम करण्यात येईल.

वेदशाळेच्या जागेविषयी पुणे महानगरपालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नेमून स्थगिती आदेश रद्द करण्याविषयी विनंती करण्यात येईल, जेणेकरून सर्व्हिस लेनसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. उच्च न्यायालाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबरनंतर श्रृंगेरी मठ परिसरातील ५४८ चौ.मीटर पैकी २७० चौ.मीटर ताबा मिळणार असल्याने सर्व्हिस रोड सुरू होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) शहरात येणाऱ्या जडवाहतुकीला ३० सप्टेंबर पर्यंत सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत दोन्ही पोलिस आयुक्तालयाच्या सीमेवर नियंत्रीत करण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील वाहतूकीवरील अतिरिक्त ताण दूर होण्यास मदत होईल.

मुळशी ते सातारा (Mulshi to Satara) मार्गावरील चांदणी चौकातील डांबरीकरणाचे काम पुढील ७ दिवसात पूर्ण करून हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल. यामुळे पुणे शहरातील वाहतूकीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. वेदशाळेच्या समोरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधितांशी चर्चा करून ४ दिवसात दुरूस्तीचे काम करण्यात येईल. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम २ दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.