निकालाच्या आधीच कॉंग्रेस-भाजपकडून विजयाचे दावे; कॉंग्रेसला १३० जागा जिंकण्याचा विश्वास

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. एकूण 224 मतदारसंघांचे निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे होते. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात 200 जागांसाठीचे प्रारंभिक कल आले आहेत. यामध्ये भाजप-कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसची काहीशी सरशी पाहायला मिळत असली तरीही भाजप मध्ये आणि कॉंग्रेसमध्ये फारसे अंतर नसल्याचे चित्र आहे.

कर्नाटकसाठी आजचा दिवस मोठा आहे, आज जनता राज्यासाठीचा कौल देणार आहे, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि आम्ही स्थिर सरकार देऊ, असा मला विश्वास आहे, असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी म्हटले आहे. तर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सलीम अहमद म्हणाले की, ‘आम्ही 130 जागा जिंकू आणि कर्नाटकात स्थिर सरकार स्थापन करू, असा आम्हाला विश्वास आहे.’ कर्नाटकातील जनतेला काँग्रेसचे सरकार हवे आहे, त्यांना देशातील सर्वात भ्रष्ट सरकार बदलायचे आहे. असे ते म्हणाले.