राजू शेट्टी आमच्यासोबतच होते पण काही कारणाने ते पलिकडे गेले – फडणवीस

नागपूर – महाविकास आघाडी सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी विरोधी अनेक निर्णय घेतले जात असल्याचा आरोप होत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता दिसू लागली आहे. काल माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर त्यांनी सडकून टीका केली.

दरम्यान, महाविकास आघाडीमधून शेट्टी बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होताच आता भाजपा त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. काल सकाळी शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर टीका करताच दुपारी भाजपनेते त्यांच्या भेटीला गेले. यावेळी बंद खोलीत सुमारे अर्धा तास कोल्हापूर उत्तर पाठींब्यासह महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपला पाठींबा देण्यासह विविध विषयावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे राजू शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात शेट्टी हे पुन्हा भाजपासोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का? असा सवाल आज पत्रकारांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर माझी याबाबत चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. सोबत कोण येणार, नाही येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मोदींनी जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले तेवढे कोणी घेतले नाही. साखर कारखानदारीबाबत जे निर्णय घेतले ते कोणीच घेतले नाही. त्याचा विचार शेतकरी नेत्यांनी केला पाहिजे, असंही ते म्हणाले.