महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका – छगन भुजबळ

नाशिक – देशात खोटा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजविलं त्यांच्याच खरा इतिहास समोर उभा आणला जाईल. देशात शेतकरी, महागाई अडचणींवर पांघरून टाकण्यासाठी भोंग्यांचा प्रश्न पुढे आणला जात असून महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय उत्तमपणे सांभाळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी राज्याचा कारभार करत असतांना अडचणी निर्माण करून मनाचा कोतेपणा दाखवू नये अशी टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राज ठाकरे का घेत नाही ? असा सवाल उपस्थित करत राज्यात केवळ तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून करून करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले कीज्या संभाजी भिडे यांची संपूर्ण हयात ही मुस्लिम द्वेष करण्यात गेली.  काही दिवसांपूर्व त्यांचा अपघात झाला त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. रियाज उमर मुजावर यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्याबद्दल नेल्सन मंडेला यांच्या नावाने मिळणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता मात्र तिकडे न जाता त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर उपचार केले. तर केवळ माणुसकीच्या धर्मातून हे भिडे यांनी समजून घ्यावी असेही ते म्हणाले.

ते म्हणाले सद्या लोकमान्य टिळकांनी रायगडावर छत्रपती शिवाजी यांची समाधी बांधली असा प्रचार केला जात असून पुरंदरे, स्वामी, टिळक यांना मोठं करायचं आणि शरदचंद्र पवार यांना जातीयवादी ठरविण्याचा कट केला जात आहे. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, अंतिम संस्कारानंतर  तिथेच त्यांची समाधी बांधण्यात आली होती, पुढे छत्रपती  संभाजी महाराजांची  राजवट आली, संभाजी महाराजांनंतर ला रायगड किल्ला मोघलांनी जिंकला आणि त्यांनी त्याचे नाव इस्लामगड केले. पुढे हा किल्ला मोघलांच्या ताब्यात होता, पेशव्यांनीतो परत जिंकला, तो पर्यंत समाधीचा उल्लेख सापडत नाही. १० मे १८१८ मध्ये इंग्रज कर्नल फ्रॉथरने तो ताब्यात घेतला आणि १८१९ मध्ये कोलाबा गॅजेटमध्ये शिवसमाधीचा पहिल्यांदा उल्लेख आला. पुढे राजयगडाचा पूर्ण नकाशा आणि अंदाज घेऊन इंग्रजांनी पुन्हा मराठे साम्राज्य उभारतील या दृष्टीने सर्व किल्ले निर्मनुष्य केले, त्यानंतर अनेक वर्षे तो किल्ला ओस पडला, त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८७९ समाधी शोधली आणि त्यावर पोवाडा लिहिला. त्यावेळेस टिळक १३ वर्षांचे होते असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, रायगडावरील छ. शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व  समाधी जीर्णोद्धार व्हावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाडगे यांची ईच्छा होती, त्यांनी तसे जाहीर केल्यानंतर टिळकांनी लगेच हिंदू महासभेची सभा बोलवून आम्ही लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करू जाहीर केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी” नावाने आयुष्यभर निधी गोळा केला. शाहु महाराज यांनी देखील लोकमान्य टिळक यांना मदत केली आहे. आणि आपल्या उभ्या हयातीत त्यांनी रायगडावर एक खडा देखील बसविला नाही.१९२६ ला इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी टिळकांच्या स्मारक समितीला पत्र देऊन स्मारकाबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरात बँक बुडाली उघड झाले, मग इंग्रजांनीच छत्रपती शिवाजी समाधीचे काम हाती घेतले मूळ अष्टकोनी चौथरा मग त्यावर छोटा अष्टकोनी चौथरा आणि त्यावरच राजपूत पद्धतीचे छत्र हे इंग्रजांनी बांधले ते १९२७- २७ दरम्यान. मग याशी टिळकांचा संबंध एवढाच कि त्यांनी केवळ पैसे गोळा केले आणि ते दुसरीकडे वळवले, याचे सर्व पुरावे आणि उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, येवला शहर हे थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती तात्या टोपे यांची येवला ही जन्मभूमी असून त्यांच्या स्मारकाचा देखील आपण विकास केलेला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा याच येवले शहरात केली. त्यामुळे या भूमीला जागतिक असे महत्व प्राप्त झाले असल्याने याठिकाणी येवला मुक्ती भूमीचा विकास आपण केलेला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदी कर्तुत्ववान व्यक्तींची स्मारके व इतर वैशिष्ट्यपूर्ण कामे झालेली आहे. पैठणीमुळे येवल्याची जगभर ओळख झाली असून पर्यटनासाठी अनकाई किल्ला, वन पर्यटनासाठी राजापूर ममदापूर पर्यटन क्षेत्र, त्याचप्रमाणे कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, बोकटे येथील कालभैरव मंदिर, अंदरसूल येथील नागेश्वरी मंदिर हे प्रसिद्ध स्थळे येथे आहेत त्यांचाही विकास आपण केलेला आहे.

ते म्हणाले की, या ऐतिहासिक येवला शहराच्या लौकीकात आणखी भर पडण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसृष्टी उभारण्याचा आपला प्रयत्न होता.  केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विकसित न करता सर्व मावळ्यांचा इतिहास उभा यामाध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्रारांचे प्रदर्शन, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी,वाहनतळ, शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे व सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी, स्वच्छतागृह व उपहारगृह, परिसरात अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा  मलनिःसारण इत्यादी कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.