आग्र्यात सांताचा पुतळा जाळत हिंदुत्ववादी संघटनांनी केला ख्रिसमसला विरोध

आग्रा : शनिवारी देशातील अनेक राज्यांमधून काही हिंदुत्ववादी संघटनांनी ख्रिसमसच्या उत्सवात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. आसाममधील सिलचर जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ख्रिसमस सण साजरा करणाऱ्या हिंदू समुदायाच्या सदस्यांवर हल्ला केला. तसेच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हिंदू संघटनांनी सांताचा पुतळा जाळला आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कथित धर्मांतराचा निषेध केला.

NDTV च्या रिपोर्टनुसार, 25 डिसेंबर रोजी आसाममधील सिलचर येथील स्थानिक चर्चमध्ये जमून लोक ख्रिसमस साजरा करत होते. त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणवून घेणारे काही लोक जबरदस्तीने चर्चमध्ये घुसले आणि ख्रिसमस साजरा करणाऱ्या हिंदूंना त्या कार्यक्रमात सहभागी होण्यास विरोध दर्शविला.

बजरंग दलाच्या या कार्यकर्त्यांनी सांगितले की, ख्रिश्चनांनी ख्रिसमस साजरे करण्यास त्यांना कोणतीही अडचण नाही, परंतु ते हिंदूंना ख्रिश्चन सण साजरे करू देणार नाहीत, कारण 25 डिसेंबर हा ‘तुलसी दिन’ देखील आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

दुसरीकडे बजरंग दल आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ‘सांताक्लॉज मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या आणि आग्रा येथील सेंट जॉन कॉलेजसमोरील चौकात सांताक्लॉजचा पुतळा जाळला, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. निषेध करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की ते ख्रिश्चन समाजाच्या ‘ख्रिसमसच्या वेळी सांताक्लॉजच्या वापराद्वारे हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कथित प्रयत्नांना’ तीव्र विरोध करत आहेत.