अजितदादांच्या सोबत नेमके किती आमदार ? धक्कादायक आकडा आला समोर

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान, अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही.अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे.

अजित पवारांच्या गटाने सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा करण्यात येत आहे.