उद्योगपती गौतम अदानींनी शरद पवारांची घेतली भेट, ‘सिल्वर ओक’वर दोन तास चर्चा

मुंबई- अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. अदानी यांनी पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी नुकतेच हिंडेनबर्ग अहवालाच्या मुद्द्यावरून अदानींना पाठिंबा दर्शवला होता, ज्यानंतर आता अदानींनी त्यांची भेट घेतल्याने (Gautam Adani Meets Sharad Pawar) चर्चांना उधाण आले आहे.

हिंडेनबर्ग अहवालाबाबत अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी संपूर्ण विरोधक करत असताना अदानींना शरद पवारांचा पाठिंबा मिळाला होता. शरद पवार यांनी या प्रकरणाच्या जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) चौकशीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र, नंतर विरोधक ठाम राहिल्यास आमची हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

यानंतर आता गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदानी सिल्वर ओकवर गेले असून जवळपास दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची समजत आहे. परंतु ही भेट शिष्टाचार आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.