व्हीआयपींपेक्षा सामान्य नागरिकांना अधिक प्राधान्य द्या; मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी एका पोलीस अधिकाऱ्याला मोठी सूचना दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला किंवा त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर कोणत्याही विशेष प्रोटोकॉलची गरज नाही, असे ते म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशीही चर्चा केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक शिवसेना आमदारांच्या बंडानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार राज्यातील सत्तेतून बाहेर पडले आणि 29 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर व्हीआयपी असा कोणताही प्रकार होणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांना दिले.

यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर कोणतीही वाहने जास्त वेळ थांबवली जाणार नाहीत आणि सुरक्षा दलांचा बंदोबस्तही रस्त्यावर कमी ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ताफ्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो, महत्त्वाच्या कामांना विलंब होतो. व्हीआयपींपेक्षा सामान्य नागरिकांना अधिक प्राधान्य दिले जाईल.