ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मोठा दिलासा; मानधनात २ हजार रुपयाची वाढ

मुंबई : थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी महावितरणला दिले आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते.

तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.