फाशी दिली तरी चालेल पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही – आव्हाड

Har Har Mahadev Controversy: ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी नुकताच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. तसेच काही प्रेक्षकांना मारहाण देखील केल्याचा आरोप आहे. आता याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

याबाबत आव्हाड यांनी एक पोस्ट केली असून यात ते म्हणतात, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले.

मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.