पोरांनी कमाल केली, कांगारूंचा धुव्वा उडवून थेट फायनल गाठली !

नवी दिल्ली : सध्या वेस्ट इंडिज येथे अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताच्या युवा संघाने कमाल करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना बलाढ्य इंग्लड संघाशी होणार आहे. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या संघाने तब्बल 96 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २९० धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार यश धुलच्या धमाकेदार ११० आणि शेख राशीदच्या तांडेखेबंद ९४ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर २९१ धावांचे लक्ष ठेवले होते. यश धुल आणि शेख राशीद फलंदाजीसाठी मैदानावर उतरले, तेव्हा संघाच्या दोन बाद 37 धावा होत्या. त्यांनी त्या कठीण परिस्थितीतून डाव सावरला व एक मोठे लक्ष्य उभारले.

भारताने विजयासाठी दिलेल्या 291 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांवर आटोपला. भारताकडून गोलंदाजी करताना पुणेकर विकी ओस्तवाल याने ३ फलंदाजांना तंबूत धाडून ऑस्ट्रेलियन संघाची कंबर मोडली तर निशांत संधू आणि रवी कुमारने प्रत्येकी २-२ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला.

फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडच आव्हान असणार आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला नमवून 24 वर्षानंतर अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. कालच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर अत्यंत सहज मात करत सलग चौथ्या वेळेस अंतिम फेरी गाठली आहे.