‘राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा’

लातूर – राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA ) आणि भाजपमध्ये(BJP) सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असून या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला विजय निश्चित व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून अपक्षांना तसेच छोट्या पक्षांना आपल्या बाजूनेवळविण्यासाठी दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत.

दरम्यान, एमआयएमची मते कोणाला जाणार याबाबत अनेक तर्क लढवले जात असताना खासदार असदुद्दिन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. राज्यसभेसाठी आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा. आम्ही पाठिंबा देऊ, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. ओवैसी यांनी गुगली टाकल्याने आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीने अजून आमच्याशी संपर्क केला नाही. त्यांनी संपर्क केला तर विचार करू. मात्र अद्याप कुणाला मतदान द्यायचे त्यावर आमचा निर्णय घेतला नाही, असं ओवैसी यांनी सांगितलं. महाविकास आघाडीकडून कोणीही आमच्या आमदारांशी संपर्क केला नाही. त्यांना आमची गरज असेल तर आम्हांला संपर्क करा. नाही तर काही गरज नाही. आम्ही आमच्या आमदारांशी बोलत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.