India Vs Bharat: “आम्ही इंडिया आघाडीचं नाव बदलून ‘इंडिया भारत’ केलं तर…”; RJD खासदाराचा केंद्राला टोमणा

Renaming India to Bharat : संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. प्रेसिडंट ऑफ भारत केल्यानंतर आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज बुधवारी निघणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे.

पण अचानक असा निर्णय घेण्यामागं विरोधकांची इंडिया आघाडी कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मोदी सरकारला टोमणा मारला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मनोज झा म्हणाले, मी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना माझ्यासोबत संविधानाचं पठण करण्यासाठी आमंत्रित करतो. राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये देशाचं नाव स्पष्टपणे ‘इंडिया दॅट इज भारत’ असं म्हटलं आहे. आम्ही त्यांना १९ जुलै पूर्वी असं काहीही म्हणताना ऐकलं नव्हतं. १९ जुलै हा तोच दिवस आहे ज्या दिवशी INDIA आघाडीची स्थापना झाली होती.

जर आम्ही आमच्या आघाडीच्या नावाचं अधिक संक्षिप्तीकरण केलं आणि आघाडीचं नाव बदलून इंडिया भारत असं केलं तर जयशंकर काय करणार आहेत? असा सवाल खासदार मनोज झा यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी थेट केंद्र सरकारला इंडिया हा शब्द वगळण्यावरुन टोमणा मारला आहे.