अयोध्येतील रामलला प्रतिष्ठापनेनिमित्त निमंत्रण आणि अक्षता वितरण अभियानाचा पुणे महानगरात शुभारंभ

Ayodhya Ram Mandir- अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या रामलला स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विक्रम संवत २०८० पौष शु. एकादशीला येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने घरोघरी जाऊन श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियानास आज शुभारंभ झाला.

या अभियानातंर्गत आज पुण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योजक, धार्मिक प्रमुख आणि अन्य मान्यवरांना अक्षता वितरण आणि निमंत्रण देण्यात आली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीच्या वतीने १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात ११ लाखांहून अधिक घरांमध्ये हे गृहसंपर्क अभियान होणार आहे. रामजन्म भूमी न्यासासाठी पुणे महानगर समिती राबविण्यात येत असलेल्या या अभियानाच्या पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पालकमंत्री अजित पवार, कॅम्प गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री चरणजीतसिंह साहनी, रेंजहिल्स येथील गुरुद्वाराचे ग्यानी जसबीर सिंगजी, जैन मुनी श्री उपाध्याय, श्री गौतम मुनीजी महाराज, प्रसिद्ध उद्योजक कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अभय फिरोदिया, बजाज ऑटोचे संजीव बजाज यांच्यासह अनेक मान्यवरांना अक्षता देऊन निमंत्रण देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी हे अभियान कशा रितीने होणार आहे आणि त्याचा तपशील याविषयी सविस्तर चौकशी केली. तर फिरोदिया यांनी जैन पंथातील रामाचे संदर्भ, हिंदू संस्कृतीवरील देशातील आक्रमणे, संस्कृती टिकवण्यासाठी समाजाने केलेले योगदान, धार्मिक नेतृत्वाचा सहभाग याविषयी सविस्तर चर्चा केली.

या अभियानातंर्गत श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने २१ हजारांहून अधिक रामसेवक १ ते १५ जानेवारी २४ दरम्यान घरोघरी जाणार आहेत.

शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील. तसेच प्रतिष्ठापनेच्यादिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन राम सेवक करणार आहेत. व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आणि राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन रामसेवक घरोघरी जाऊन करणार आहेत.

दि. १ ते १५ जानेवारी दरम्यान हे गृहसंपर्क अभियान पूर्ण झाल्यानंतर सोमवार २२ जानेवारीपर्यंत पुणे शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील पुणे शहरातील दोन हजारांहून अधिक मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, व नृत्याचे कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, शहरातील कलाकार कट्ट्यावर विविध कलांचे सादरीकरण, सोसायटी व मंदिरांमधून रामसंकीर्तनाचा समावेश आहे. या आनंदोत्सवात पुणेकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’