‘कॉंग्रेसला उमेदवारांकडून निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची शपथ द्यावी लागते यासारखे दुर्दैव नाही’

पणजी – जागांच्या बाबतीत अनेक राज्यांच्या तुलनेत गोवा अगदीच लहान असला तरी येथील पक्षांतराचे राजकारण मात्र देशभर चर्चेचा विषय बनत असते. या राज्यात विजयापेक्षा नेत्यांच्या पक्षांतराचा प्रश्न आहे, म्हणून काँग्रेस सध्या मंदिर, मशिदी, चर्चच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या पक्षांतराचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेस पक्षाला बसला होता.बऱ्याच काळ पक्षातून आउटगोइंग सुरु असताना आता संधी पाहून पुन्हा काही नेते मंडळी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आता याच दलबदलू नेत्यांच्या भरवश्यावर आता कॉंग्रेस गोव्याच्या निवडणुकीत उतरली आहे.

दरम्यान, आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेत कॉंग्रेसकडून सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याचे वचन घेण्यात आले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली. निवडणूक झाल्यानंतरही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे यावेळी सगळ्यांनी शपथ घेतली आहे.

याच मुद्द्यावरून आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. अमेठी मतदारसंघातून निवडणूक हरलेल्या नेत्याला गोव्यात येऊन आपल्या उमेदवारांकडून निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची शपथ द्यावी लागते यासारखे दुर्दैव नाही, असे सांगत स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली. भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांच्या चावडी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.