कोण अयोध्येत गेला काय किंवा…. सर्वसामान्यांना बसणारे महागाईचे चटके कमी होणार आहेत का? 

मुंबई  – कोण अयोध्येत (Ayodhya) गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमास आले असता माध्यमांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांच्या अयोध्या जाण्याचा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी कोण कुठेही जाऊदे आम्ही फक्त महागाईवर बोलणार असे स्पष्ट केले.

महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स (Headlines) महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय आणि आम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीय. आम्ही फक्त महागाईवर बोलणार… ते कुठेही जाऊदेत आम्हाला काही करायचं नाही… मात्र एक लक्षात ठेवा लोकं आज ‘श्रीराम’ म्हणतायत… महागाई इतकी वाढू देऊ नका की त्यांना ‘राम नाम सत्य’ आहे म्हणावं लागेल असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला… कोण कुठे जाणार आहेत त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे… त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत त्याच्याशी आमचा काय संबंध… त्यांना मोसादची (Mosad) द्या नाहीतर अमेरिकेची सीआयए(CIA)  द्या… अशी उपरोधिक टिकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेच नको ते विषय पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय… मला महागाईवर विचारलात आणि पोचलात अयोध्येत… असे पत्रकारांना सुनावतानाच तुम्हालाही चिंता नाही भाव कुठे जात आहेत त्याची… पगार कसे आहेत… आपल्या नोकर्‍या राहणार आहेत की नाही…चॅनेल चालणार आहेत की नाही… किती पेपर बंद पडले आणि किती सुरु आहेत याची कुणालाही चिंता नाही मात्र ते अयोध्येला जात आहेत… अहो जाऊ द्या ना तुमचं घर कुठं चाललंय ते बघा…असा सबुरीचा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

महागाईचा दर (Inflation rate) १४ वर पोचला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने यावर चर्चा करायला हवी पण तुम्हा लोकांना सवय लागलीय नको त्या विषयांना नको त्या विषयांकडे घेऊन जायचं…असेही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले.