महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील गाण्यांवर नाचणाऱ्यांनी नाक रगडून माफी मागावी; नगरमध्ये कॉंग्रेस आक्रमक

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नगर येथे पार पडला. महाराजांच्या पुतळ्यासमोरच अश्लील गाण्यांवर काही जणांनी टेका धरला होता. यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. छत्रपतींच्या पुतळ्यासमोर अश्लील गाणे लावून त्यावर नाचणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

किरण काळे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार जगताप यांच्यावर आरोप केले आहे. ते म्हणाले की, रविवारी सायंकाळी शहरातील जुन्या बसस्टॉपजवळ अनेक वर्षांपासूनचा उभारलेल्या महाराजांच्या पुतळ्याला रंग देऊन त्याला नवीन केल्याचं भासवून लोकांना फसवलं आहे. त्यापद्धतीचं वातावरण निर्माण करून शिवप्रेमी आणि समाजाची फसवणूक जगताप यांनी केली आहे.

महाराजांच्या पुतळ्याचा खर्च हा महापालिकेने केला आहे. येथील आमदार शहरांच्या विकासकामात हातभर लावत नाही. शहरातील रस्त्यांची, पुतळ्यांची अवस्था पाहिली तर तुमच्या सर्व लक्षात येईल. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्यात दुखवटा दिन पाळला जात असताना लोकप्रतिनिधी बिनधास्त गाण्यांवर नाचत आहे. जगात काय चाललं आहे यांना विसर पडला आहे, अशी टीका देखील काळे यांनी जगताप यांच्यावर केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पुढे ते म्हणाले की, सोहळ्यात महाराजांचे पोवाडे वाजवणे आवश्यक असताना ह्या आमदारांनी अश्लील गाण्यांवर नाच केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराजांच्या नावाने जयघोष करताना देखील यांनी लाज बाळगली पाहिजे होती. यातून सर्व दिसून येते की, यांना फक्त याठिकाणी राजकारण करायचं होतं. तसेच सावेडीतील संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं खरेखुरे लोकार्पण पार पाडण्यात देखील यांनी आडवा पाय घातला असल्याचा आरोप काळे यांनी केला.