मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?; लैंगिक अत्याचाराच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंग यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली- महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांना तोंड देत, भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांनी या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य करणाऱ्यांना उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका टीव्ही मुलाखतीत सिंग म्हणाले की काही लोक असा दावा करत आहेत की, मी १००० महिलांवर लैंगिक अत्याचार केले, जसे की मी शिलाजीत की रोटी खाल्ली आहे.

ब्रिजभूषण सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आंदोलक कुस्तीपटू आधी सांगत होते की, मी १०० मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. मग ते नंतर १००० मुलीसोबत असं झालं असं सांगू लागले. इतक्या मुलींवर लैगिंक अत्याचार करायला मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?”

जर हे लोक जंतरमंतरवर गेले तर मी राजीनामा देईन, तसेच आंदोलक पैलवान राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला. सात महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदारावर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, शुक्रवारी गुन्हा दाखल केला गेला आहे. पहिली एफआयआर अल्पवयीन कुस्तीपटूच्या आरोपांशी संबंधित आहे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पीओसीएसओ) कायद्यांतर्गत नोंदवण्यात आली आहे, तर दुसरी एफआयआर महिलांच्या विनयभंगाशी संबंधित आहे.