तुमच्या दोघांच्या बापानी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लचके तोडले; आदित्य ठाकरे-सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी

मुंबई: राजकारणात (Maharashtra Politics) आरोप-प्रत्यारोप नवे नाहीत. कधी विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात, तर कधी सत्ताधारी विरोधकांवर जबरदस्त पलटवार करतात. अशातच मराठा युवा सेना संघटनेने (Maratha Yuva Sena) माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात थेट बॅनरबाजी केली आहे. या बॅनर्समध्ये आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचा उल्लेख पेंग्विन असा करण्यात आला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या वाढत्या संपत्तीवरूनही शेरेबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या वेशीवरच हे बॅनर्स लावण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फ्रीवे परिसरात बॅनर्स लागले आहेत. मराठा युवा सेनेने नाव न घेता या बॅनर्सद्वारे आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. दोन पेंग्विन व कुंडीतील वांगी अशा आशयाचे बॅनर लावून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी फक्त पेंग्विन देण्याचं काम केलं. तर एका ताईनं जिने कुंडीत वांगी लावून करोडो रुपये कमवले. आता महाराष्ट्राला कोरडे उपदेश देत आहे, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे.

तुमच्या दोघांच्या बापानी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लचके तोडले म्हणून राज्यातील तरुण पन्नास वर्ष मागे गेला आहे. बाप काढणं हि आमची संस्कृती नाही. पण सुरुवात तुम्ही केली. शेवट आम्ही करणार, असा इशाराही या बॅनर्सवरून देण्यात आला आहे.